पुण्यातील या मैदानाला दिलं जाणार गोल्डमॅन नीरज चोप्राचं नाव
क्रीडा

पुण्यातील या मैदानाला दिलं जाणार गोल्डमॅन नीरज चोप्राचं नाव

पुणे : पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राचं नाव दिले जाणार आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी या मैदानाला नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असं नाव देण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी १६ ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरीकडे, नीरजला बढती दिली जाणार असून ऑलिम्पिकमधील त्याची कामगिरी पाहून नियमांनुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण दलांनी नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं होतं. नीरजला १५ मे २०१६ पासून ४ राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

भारतानं अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अ‍ॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.