रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
क्रीडा

रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

पुणे : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या जोडीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी भारतासाठी मोठे काम करत आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित आणि शिखर या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी नोंदवणारी ही भारताची दुसरी जोडी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 176 डावांत 8227 धावा केल्या होत्या. तर, जागतिक विक्रमाबाबत सांगायचे झाले तर, वनडेमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणारी ती सातवी जोडी ठरली आहे. या विक्रमात श्रीलंकेची महिला जयवर्धने आणि कुमार संगकाराची जोडी (5992) दुसऱ्या स्थानी आहेत.

पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या दहा षटकात टीम इंडियाने बिनबाद 65 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14.1 षटकात या दोघांनी भारताचे शतक साकारले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवनही जास्त वेळ टिकला नाही. रशिदने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले.

रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने आणखी एक विक्रम आपल्या नावांवर केला आहे. शतकी भागीदारी करणाऱ्या सलामी जोडीच्या यादीत रोहित आणि शिखर दुसऱ्या स्थानावर आले आहेत. या यादीत भारताचे सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली आहेत. त्यांनी एकूण २१ शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत, तर आता त्यांच्या खालोखाल रोहित आणि शिखर यांनी १७ वेळा शतकी भागीदारीची नोंद केली आहे. आज त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट आणि मेथ्यू हेडन या जोडीला मागे टाकले. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १६ वेळा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000पेक्षा जास्त धावांची भागीदारी
8227 : तेंडुलकर-गांगुली
5992 : संगकारा-जयवर्धने
5475 : दिलशान-संगकारा
5462 : जयसूर्या-अट्टापट्टू
5409 : गिलख्रिस्ट-हेडन
5206 : ग्रीनिज-हेनेस
5004 : रोहित-धवन