इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी

ॲडलेड: टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध आज भारताची लढत होणार आहे. जेतेपदापासून दोन पावले दूर असलेला भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लिश संघाला चारण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. भारताने गट सामन्यात इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आहे पण आता ती भूतकाळातील गोष्ट आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयाने या टप्प्यावर पोहोचल्यानंतर जुन्या आकड्यांचा काहीच उपयोग नसल्याचे दिसून आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘ड्रीम फायनल’ पाहण्याची चर्चा जगभरातील क्रिकेट चाहते करत आहेत. पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारून त्यांचे अर्धे स्वप्न पूर्ण केले आहे. आता हे स्वप्न पूर्ण करण्याची पाळी भारताची आहे.

इतिहास काय सांगतो

आयसीसी स्पर्धांचा गेल्या काही वर्षांचा इतिहासही भारताच्या बाजूने नसल्याचे दिसून येत आहे. २०१३ पासून भारतीय संघ शेवटच्या दोन टप्पे पार करू शकलेला नाही. २०१४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला. रोहित शर्माने हे सर्व सामने खेळले आहेत पण तो कर्णधार नव्हता, त्यामुळे कर्णधारपदाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्याच्या पाठीवर भूतकाळाचे कोणतेही ओझे नाही.सरावादरम्यान दुखापतीने त्रस्त असलेला रोहित शारीरिक वेदना विसरून सुरेख खेळी करण्याचा विचार करेल. आतापर्यंत त्याला पाच सामन्यांत केवळ ८९ धावा करता आल्या आहेत. त्याच्या टीकाकारांना उत्तर देण्याची उपांत्य फेरीपेक्षा चांगली संधी त्याच्याकडे असू शकत नाही

बरोबरीची टक्कर.

विराट कोहलीला पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी आदिल रशीदचा सामना करावा लागणार आहे तर सूर्यकुमार यादव सॅम कुरन आमनेसामने असणार आहेत. स्टोक्सचा सामना हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू क्षमतेचा असेल. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने यापूर्वीच कबूल केले आहे की त्याने अजूनही सर्वोत्तमी कामगिरी केलेली नाही.

उपांत्य फेरीच्या सामन्यात जॉस बटलर आणि स्टोक्स फॉर्ममध्ये परतणार नाहीत याची काळजी भारतीय संघाला घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, इंग्लिश संघाला राशिदने कोहलीविरुद्ध पुन्हा एकदा यश मिळावावे अशी इच्छा आहे. सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, कोहलीला रशीदकडून ५९ चेंडूत केवळ ६३ धावा करता आल्या आहेत आणि तो दोनदा बाद झाला आहे.