प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश
बातमी महाराष्ट्र

प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच बालके शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. धाडसी कामगिरीचा शौर्य पुरस्कार कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि.नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित राहूल पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या मुलांचे कौतुक केले आहे. ”महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे. बहादुरी आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहिली आहे असे सांगून ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मुलांचे कौतुकही केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने रविवारी घोषित करण्यात आलेल्या बाल शौर्य पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्रातील पाच बालकांना पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात कामेश्वर वाघमारे याचा क्रमांक पहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज येथील मागासवर्गीय समाजातील या बालकाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान होत असल्याने आपणास अत्यंत आनंद होत असल्याची माहिती आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिली आहे.

कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.