कोहली द ग्रेट; मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम
क्रीडा

कोहली द ग्रेट; मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा मायदेशातील हा २२ वा कसोटी विजय होता. या विजयासह विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या नावावर होता. धोनीनं मायदेशात २१ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नईतील दुसरा सामना जिंकून विराट कोहलीनं धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता या विजयासह मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराट आणि धोनीनंतर या यादीमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि सुनील गावसकर यांचा देखील समावेश आहे. मायदेशात अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारतानं १३, गांगुलीच्या १० आणि गावसकर यांच्या नेतृत्वात ०७ विजय मिळवले आहेत.

याआधीच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील ५९ कसोटी सामन्यात भारतानं ३५ विजय मिळवले आहेत. तर १४ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. १० सामने अनिर्णीत राखण्यात विराटला यश आलं आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने ६० कसोटी सामन्यांपैकी भारतानं २७ सामने जिंकले आणि १८ गमावले. तर १५ सामने अनिर्णीत राहिले होते.