जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय
क्रीडा

जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रलियाकडून पराभूत झाल्यावर भारताने चांगलाच वचपा काढत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारतीय संघाने ११ धावांनी सामना जिंकत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय गोलंदाज टी नटराजन, युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर कर्णधार  अॅरॉन फिंच ३५ शॉर्ट ३४ यांच्या व्यतिरिक्त जास्तकाळ कोणीही तग धरु शकले नाही आणि १६२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मौदानात उतरलेला ऑस्ट्रलियाचा संघ ७ बाद १५० धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून नटराजन आणि चहलने ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं . पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर विराट ९ धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता, परंतू दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या.