पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय
क्रीडा

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर रोमहर्षक विजय मिळवला. पोलिार्डच्या झंझावातासमोर चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीला २ चौकार आणि एक षटकार खेचत सामना आपल्या बाजूने फिरवला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, पोलार्डमुळे मुंबईने चेन्नईवर ४ गडी राखून विजय नोंदवला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केल्यानंतर रोहित बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने स्थिरावलेल्या क्विंटन डी कॉकचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मैदानात आलेल्या पोलार्डने पंड्यासोबत भागीदारी रचली. १७व्या षटकात सॅम करनने कृणाल पंड्याला पायचित पकडत ही भागीदारी मोडली. कृणालने ३२ धावा केल्या. कृणाल बाद झाल्यानंतर हार्दिक मैदानात आला. २ षटकात मुंबईला विजयासाठी ३१ धावांची गरज असताना त्याने दोन षटकार ठोकले. पण, त्यानंतर तो बाद झाला. मग पोलार्डने मुंबईला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. फाफ डु प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद २१८ धावा फलकावर लावल्या. आयपीएलमध्ये चेन्नईच्या मुंबईसमोर या सर्वाधिक धावा ठरल्या.