प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे स्पष्टीकरण
राजकारण

प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवर भाजपचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून बुधवारी ४३ जणांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. दरम्यान महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली. मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या भगिनी आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला बळ मिळालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत असला तरी केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही पक्षात इतरांनाही संधी मिळते हा संदेश दिला जात असल्याचं मानले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

भाजपाचं स्पष्टीकरण
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचं अभिनंदन केलं नसून त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचं प्रवीण दरेकर यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल.