महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!
ब्लॉग

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!

तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२०- २१ वर्षासाठी ५७ कोटी ६७ लाख ५३ हजार निधी वितरीत केला आहे. केंद्र आणि राज्याचा मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेत सरकारने ३१५ कोटी ६० लाखाची तरतुद केली आहे. त्यातील ४१ कोटी ९० लाख वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अर्थात एमएसआरएलएमची सुरुवात महाराष्ट्रामध्ये २०११ साली झाली. त्यानंतर पाच टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यभर हे अभियान सुरू झाले. पाचव्या टप्प्यानंतर आज या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील ५० लाखांपेक्षा जास्त महिला यामध्ये जोडल्या गेल्या आहेत.

मागच्या नऊ वर्षांमध्ये या अभियानात काम करणाऱ्या राज्यभरातील तीन हजार पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शहरापासून गावापर्यंत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे मोठे काम केले आहे.

उमेदचा विस्तार –
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्रात २०११ पासून टप्प्या-टप्प्याने ३४ जिल्ह्यात आज काम करत आहे. या अंतर्गत चार लाख ७७ हजार स्वयंसहायता समूह अंतर्गत जवळपास ५० लाख कुटुंब अंतर्भूत आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा –

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात केंद्राचा ७५ तर राज्याचा २५ टक्के निधी देते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे. कोरोनाच्या महामारीतही बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्ष्मीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येऊन मास्क तयार करणे आणि नवनवीन वस्तू तयार करण्याचे काम करत आहे. यामुळे या दिवसातही त्यांना नवी उमेद मिळाली आहे.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर ‘उमेद’मध्ये –

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानात रुपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. राज्य देखील ही योजना राबवत आहे. या अभियानामार्फत बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी घेतली आहे़. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल टाकले जात आहे. विकासाच्या दिशेने भरारी घेण्यासाठी महिलांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्याचा प्रयत्न उमेद करीत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र सरकारकडून केले जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाना समृद्ध, आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी उमेद अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येत आहेत.

या माध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जात आहे. उमेदच्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारासह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. अनेक महिला बँकेमार्फत कर्ज घेऊन काम करत आहेत.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्यात आले. राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या नावाने हे अभियान राबविले जात असताना त्याचे ‘उमेद’ असे नामकरण करण्यात आले. ‘उमेद’ या शब्दातच योजनेचा सगळा सार सामावला आहे. ‘उमेद’ ही कार्यकर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट. ‘उमेद’ असेल तर माणूस पुन्हा उभं राहू शकतो. याच ‘उमेद’ने लाखो स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली. त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले.

उमेदचे (umed) लाभ

‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. यामध्ये गरिबी निर्मूलनाचा समग्र विचार करण्यात आला असून समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा यात समावेश आहे. सामाजिक, आर्थिक आणि वित्तीय समावेशाबरोबर सार्वजनिक सेवांची उपलब्धता आणि विविध योजनांचे लाभ हे ‘उमेद’चे आधारस्तंभ आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी ‘उमेद’ अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येतात. स्वयंसाहाय्यता गटाद्वारे, बचतगटाद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार केले जातात. या संस्थांच्या माध्यमातून गरिबांचे अधिकार, हक्क, वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते.

राज्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्तींची एक भक्कम फळी गावपातळीपर्यंत उभी केली गेली आहे. समुदाय संसाधन व्यक्तीमार्फत गरीब कुटुंबांची नेमकी ओळख करून त्यांना स्वयं सहाय्यता गटात समाविष्ट करण्याचे मोलाचे काम या अभियानांतर्गत केले जाते. समुदाय संसाधन व्यक्ती या स्थानिक स्त्रिया असून त्या समुदाय संस्थाचा एक भाग म्हणून काम करतात.

‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची राज्यात १५ जिल्ह्य़ांत आणि १३४ तालुक्यांत इन्टेन्सिव्ह पद्धतीने तर उर्वरित तालुक्यात सेमी व नॉन इन्टेन्सिव्ह पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. सेमी आणि नॉन इन्टेंसिव्ह तालुक्यांचे रूपांतर टप्प्या टप्प्याने इन्टेन्सिव्ह तालुक्यात केले जाईल. इन्टेंसिव्ह पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्य़ात आणि तालुक्यात जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यस्तरापासून ग्रामस्तरापर्यंत स्वतंत्र मनुष्यबळाची व अंमलबजावणी यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे.