राज्यात उद्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या ड्रायरनला सुरवात
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात उद्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या ड्रायरनला सुरवात

मुंबई : राज्यात उद्यापासून म्हणजेच २ फेब्रुवारीपासून लसीकरणाच्या सराव फेरीला (ड्रायरन)सुरवात होणार आहे. यासाठी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना लसीकरण ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी तीन ठिकाणी सराव फेरी होईल. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार केले जातील. महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय येथे ही सराव फेरी होईल.

नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची सराव फेरी होईल.