ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग
कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग

नवी दिल्ली : नव्या प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने सक्तीचे लॉकडाऊन लागु केल्यामुळे भारतीय कलाकार तिथे अडकून पडले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या कोरोना विषाणूच्या आघाताला जगातील काही देश अजूनही सामोरे जात असतानाच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. याबाबत दहशतीचं वातावरण असतानाच आता कोरोना विषाणूचा नव्यानं आणखी एक प्रकार समोर आल्यामुळं या दहशतीत भर पडली आहे. यामुळे ब्रिटन सरकारने सक्तीचे लॉकडाऊन लागु केले आहे. ज्यामुळं अनेक भारतीय सेलिब्रिटी, कलाकार इंग्लंडमध्ये अडकले आहेत.

अशातच ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, रिंकू काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं अतिशय सक्तीनं पालन करण्यात येत आहे. त्यामुळं कलाकारांना परतीचे मार्ग सध्या तरी बंद झाले आहेत.

दरम्यान, भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याकालावधीत कलाविश्वासह सर्वच क्षेत्रातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होतं. पण, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. अनेक कलाकार पुन्हा चित्रीकरणांमध्ये व्यस्त झाले. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, आफताब आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनच्या या कचाट्यात सापडलेल्या सेलिब्रिटींसमवेत त्यांच्या चित्रपटातील क्र्यू मेंबर्सही असल्याचं कळत आहे.

तर दुसरीकडे, कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतची माहिती समोर येताच ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी इग्लंडसह संपूर्ण जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर भारतातही या विषाणूच्या संसर्गाबाबत निरीक्षणांना वेग आला असून, आरोग्य यंत्रणा सजग झाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याचे नियम लागू करण्यात आले आहेत.