सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा
कोरोना इम्पॅक्ट

सावधान ! येणारे दहा दिवस महत्त्वाचे; कोव्हिड टास्क फोर्सचा इशारा

संपूर्ण राज्यासह राजधानी मुंबईत काल (ता.२४) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल राज्यभरात कोरोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉक्टर राहुल पंडित म्हणाले की, ”मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर प्रकरणं आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचं प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढलं आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल. पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो अशापद्धतीचे असतील. असे संकेतही यावेळी डॉ. पंडित यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याबरोबरच मुंबईतील ही वाढ चिंताजनक आहे. त्यातल्या त्या दिलासा देणारे वृत्त म्हणजे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली असून बुधवारी कोरोनामुळे मरण पावलेल्या मुंबईमधील रुग्णांची संख्या केवळ चार होती. बुधवारी २१ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाची प्रकरणं आणि पॉझिटीव्ही रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ सहा टक्क्यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्य आहेत,” असंही काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

तर टास्क फोर्समधील सदस्य असणाऱ्या डॉक्टर शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची वाढ यंदा विदर्भामधून सुरु झाली आहे. या रुग्णवाढीमध्ये नवीन कोरोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असं म्हणता येणार नाही. त्यामुळे पुढील १० दिवसांमध्ये राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हे ठरेल. तसेच ज्या लोकांना आधी करोनाचा संसर्ग झाला नव्हता आता ते अधिक फिरु लागल्याने करोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली आहे अशी शक्यताही जोशी यांनी व्यक्त केलीय.

काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी आकडेवारी सादर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आदेश दिले. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये दैनंदिन करोना रुग्णांचे प्रमाण दोन हजार ९७३ इतके होते. तर मृत्यूदर हा १.७ टक्के होता. फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन करोना रुग्णांचा आकडा हा तीन हजार ३४७ इतका आहे. तर मृत्यूदर ०.४ टक्के इतका आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तर मृत्यूदर कमी असल्याचे म्हटले आहे.