कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर लवकरच लस येणार हे निश्चित झाले असताना केंद्र सरकारने देशवासियांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोना लस निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं आहे. देशभरात ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हर्षवर्धन म्हणाले, ‘देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे, असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.