महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक; आतापर्यंत एवढ्या लोकांचे लसीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक; आतापर्यंत एवढ्या लोकांचे लसीकरण

मुंबई : राज्यात आज (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. तसेच, राज्यात आज ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांत राज्यात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. तर, केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल. आपण सर्वानी लसीकरणाची प्रतिज्ञा करू या. आपण संघटितपणे करोनाचा पराभव करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

सर्वासाठी मोफत लसीकरण मोहिमेनुसार केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, लसीकरणातील प्रगती आदी निकषांनुसार लसामात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.