धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्यापासून काल राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. ही आकडेवारी राज्यसरकार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा विक्रम गुरूवारी मोडीत निघाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात पासून कमी झालेला कोरोनाचा संसर्ग फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा वाढू लागला होता. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारांच्या काठावर पोहचली. तर मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांसह राज्यातील इतरही शहरात करोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू, अंशतः लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९०.७९ % एवढे झाले आहे. गुरुवारी झोप उडवणारी आकडेवारी समोर आली. राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. प्रत्येक शहरात दररोज रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून, प्रशासनाकडून निर्बंध वाढवले जात आहे. मात्र, संसर्ग थांबत नसल्यानं अधिक कठोर उपाय लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात पहिली लाट आली, तेव्हा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. या पूर्वी सर्वाधिक रुग्ण १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ नोंदविले होते. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली.

राज्यातील मुंबई-ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव अशी अनेक शहरे व जिल्हे पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्या ठिकाणची बंद करण्यात आलेली कोविड उपचार केंद्रे पुन्हा सुरू करावी लागत आहेत. एवढेच नव्हे, तर काही शहरांत अंशत: टाळेबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही मंडया, बाजारपेठा, दुकाने येथे गर्दी सुरू आहे आणि लोक मास्क न घालता, अंतर न ठेवता फिरताना दिसत आहेत.

तर, देशामध्ये बुधवारी जे २८ हजार रुग्ण आढळले, त्यापैकी २३ हजारांहून अधिक महाराष्ट्रातील होते. गुरुवारी देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३६ हजारांच्या घरात गेला. त्यात एकट्या महाराष्ट्रातील रुग्ण आहेत ३० हजारांच्या आसपास. म्हणजे रुग्णांतील ६० टक्के आपल्या राज्यातील. हे चित्र केवळ चिंताजनकच नव्हे, तर भयावहही आहे. आपणच ओढवून घेतलेले हे दुखणे आहे.