अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन
मनोरंजन

अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन

मुंबई : अभिनेता शर्मन जोशी यांचे वडील आणि दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. अरविंद जोशी यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले या ठिकाणच्या स्मशान भूमीत हिंदू पद्धतीने करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अरविंद जोशी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अभिनेता शर्मन जोशी, पत्नी आणि एक मुलगी मानसी जोशी- रॉय असा परिवार आहे. मानसी जोशी रॉय या अभिनेता रोहित रॉय यांच्या पत्नी आहेत. अरविंद जोशींचे नातेवाईक आणि अभिनेता प्रेम चोप्रा म्हणाले की, “अरविंद एक चांगले व्यक्ती होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती होते. वयाच्या मानाने त्यांची तब्बेत खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची नेहमी दखल घेतली जाईल.”

अरविंद जोशी यांनी गुजरातीमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केलेलं आहे. गुजराती नाटकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे आणि त्याचे दिग्दर्शनही केलं आहे. अरविंद जोशी यांनी ‘इत्तेफाक’, ‘शोले’ ‘अपमान की आग’, ‘खरीदार’, ‘ठीकाना’ ‘नाम’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका केली आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकामधूनही अभिनय केला आहे.