मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी
मनोरंजन

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी करणारी याचिका अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिने केली आहे. यावेळी कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप करत कोर्टात धाव घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगना आणि तिच्या बहिणीनं आता या तिन्ही खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. दरम्यान, खटल्याचे स्थानांतरण करण्यासाठी कंगनानं शिवसेनेवर आरोप करत दिलेलं कारण यावरुनही आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांकडून अद्याप कंगनाच्या या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मुंबईतील वकील अली कासीफ खान यांनी कंगनाविरोधात खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांनी केला आहे. अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. तिसरा खटला कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात केला आहे. कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे त्यांच्या मुंबईत तीन खटले सुरू आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी अंधेरी कोर्टानं कंगनाविरोधात वॉरंट देखील जारी केलं आहे. कंगनाला सातत्यानं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देऊनही ती चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यानं हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून सुरु झालेला हा वाद अद्यापही संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. सुशांतसिंह राजपूत, शेतकरी आंदोलन, याबरोबरच राज्यातील ठाकरे सरकार विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे.