दीपिकाने दिला ‘या’ महत्वाच्या पदाचा राजीनामा; २०१९ला स्वीकारलेले अध्यक्षपद
मनोरंजन

दीपिकाने दिला ‘या’ महत्वाच्या पदाचा राजीनामा; २०१९ला स्वीकारलेले अध्यक्षपद

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोने सोशल मीडियाच्या साहाय्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा तिने राजीनामा दिला आहे. दीपिकाने मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज म्हणजे MAMI या संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने २०१९ साली मामीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा निर्णय जाहीर करताना दिपीकाने म्हटले, या संघटनेच्या संचालक मंडळात असणं आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणं हा खरंच खूप काही शिकवणारा अनुभव होता. कलाकार म्हणून जगभरातून चित्रपट आणि प्रतिभावान कलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणं हे खूप जबाबदारीचं आणि महत्त्वाचं काम होतं. पण मला असं लक्षात आलं आहे की, माझ्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मला वाटत नाही की मी मामीच्या कामाकडे आवश्यक तेवढं लक्ष देऊ शकेन. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम राहतील.

आपल्याला कधी एकटं वाटू न देण्याची ताकद चित्रपटात आहे. या डिजीटल स्ट्रिमिंग आणि सोशल मीडियाच्या युगात आपण हळूहळू स्वतःला एकटं करुन घेत आहोत. पण मामी ही संस्था सीमांची सर्व बंधनं झुगारून आपल्याला एकत्र बांधून ठेवत आहे. एक कलाकार म्हणून मला चित्रपटाच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी तर म्हणेन आपल्याला आत्ता त्याची गरज आधीपेक्षाही जास्त आहे, असेही दिपीकाने म्हटले आहे.