शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका; दिलजीत दोसांजचे आवाहन
मनोरंजन

शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका; दिलजीत दोसांजचे आवाहन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता देशातील इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या पाचही फेऱ्या निष्फळ झाल्याने हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र या शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका असे आवाहन पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे सर्व राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार या निदर्शनास विरोध किंवा समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे बॉलिवूडही यात सक्रिय भूमिका निभावत आहे.आंदोलनाच्या नावाखाली काही लोक हिंदू-शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा आहे. यात धर्माचा कोणताच मुद्दा नाही. कोणताही धर्म कधीच वाद करण्यासाठी सांगत नाही, असं ट्विट दिलजीतने केलं आहे. दिलजीतने हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झालं.

दरम्यान, सध्या सर्वत्र या शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु आहे. यामध्येच अनेकांकडून आंदोलनाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच दिलजीतने नागरिकांना आंदोलनाकडे आंदोलन म्हणूनच पाहा, त्यात जातीयवादाचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न करु नका, असं आवाहन केलंय. त्याने ट्विट करत त्याच मत मांडलं आहे.