गझलकार इलाही जमादार यांचे निधन
मनोरंजन

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सांगली : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींनी व्यक्त केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.

2020च्या जुलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्याने त्यांना जबर मार लागला होता. शिवाय वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशही झाला होता. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी लिहिलेल्या 13 दोह्यांच्या ”दोहे इलाहीचे” या संकलनात्मक पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं होतं.

ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेत असत. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, हे असे बागेवरी उपकार केले, अनाथ होईल वेदना जगी माझ्यानंतर या त्यांच्या काही प्रसिद्ध गझल होत.