रवी पटवर्धन यांच्या निधनाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला मुकलो : अमित देशमुख
मनोरंजन

रवी पटवर्धन यांच्या निधनाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला मुकलो : अमित देशमुख

मुंबई : आपल्या भारदस्त अभिनयाने चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने आपण एक हरहुन्नरी कलाकाराला गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली. मराठी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी (ता.५) वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे रवी पटवर्धन यांनी रंगभूमी असो चित्रपटसृष्टी वा दूरचित्रवाणीचा छोटा पडदा या सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवला. आपल्या अभिनयातून वैविध्यपूर्ण भूमिकांना अजरामर करणाऱ्या रवी पटवर्धन यांच्या निधनाने ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली आहे.

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. त्यांची शेवटची गाजलेली भूमिका ही छोट्या पडद्यावरील अगंबाई सासुबाईमधली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म 06 सप्टेंबर 1937 रोजी झाला. बालगंधर्व हे 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. बालगंधर्वांच्या अध्यक्षतेखालील 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवात वयाच्या साडे सहाव्या वर्षी रवी पटवर्धनांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते.

रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि 200 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या 82 व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या.