थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत
पुणे बातमी

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या बौद्ध उपासकांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मैत्री थाई प्रकल्पातून तब्बल 31 रुग्णवाहिका भारताला देण्यात आल्या आहेत. थायलंडचे कॉन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थित पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

थायलंडच्या थेरवादा फॉरेस्ट ट्रॅडिशनचे भन्त अजान जयासारो यांनी थायलंडमधील बौद्ध उपासकांना भारताला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्या मदतीतून भारतासाठी नव्या 31 रुग्णवाहिका घेण्यात आल्या. शनिवारी पुण्यात टाटा मोटर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. मैत्री थाई प्रकल्पातून आलेल्या 31 रुग्णवाहिका या बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लदाख, या बौद्ध स्थळांसह नागपूर, औरंगाबाद, बंगळुरू दिल्लीसह देशातील विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकिय सुविधा पुरवणार आहेत.

यावेळी कौन्सुल जनरल सिरिकुल म्हणाले की, मैत्री थाई प्रकल्पामुळे थायलंड आणि भारत यांमधील मैत्रीचे दर्शन घडले. डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हे सर्व घडवून आणण्यात फार मोलाची मदत केली, असा उल्लेख करून त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. तर तथागत बुद्धांचा देश म्हणून थायलंडचे नागरिक भारताचा आदर करतात. बुद्धधम्माच्या दान परीमितेला अनुसरून या 31 रुग्णवाहिका प्रदान केल्या, असे सांगून उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भन्ते अजान जयासारो आणि थायलंडमधील उपासकांचे भारतीयांच्या वतीने आभार मानले.

थायलंडकडून दुसऱ्यांदा मदत
थायलंडमधून भारताला दुसऱ्यांदा वैद्यकीय मदत मिळाली असून मूळच्या थायलंड येथील उपासिका असणाऱ्या डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्याकडून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. एखाद्या धर्माच्या अनुयायांकडून दान भावनेने सहाय्यासाठी एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका देण्यात आल्याबद्दल थायलंडमधील सर्व बौद्ध उपासकांचे आभार भारतीयांच्या वतीने मानण्यात येत असून याची चर्चाही होत आहे.