भाजपच्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपच्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा

कोल्हापूर : ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी माघार घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्याच पक्षाचा अध्यक्ष होणार असा दावा केला होता. मात्र जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पी. एन . पाटील यांनी मुलगा राहूल पाटीलसाठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली. काल रात्रीपासून दोन्ही मंत्री व आमदार पाटील यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा होऊन अखेर अध्यक्षपद राहुल पाटील यांना देण्यास दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शवली. तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद देण्यात आले.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुका महत्वाच्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यासाठी ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक महत्त्वाची आहे. या दोन्हीसाठी आमदार पाटील यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.