राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश
बातमी मुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला अडकवण्याचा कट मुंबई पोलिसांच्या अमलीपदापर्थ विरोधी पथकाने उधळून लावला आहे. पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध करत पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन हा कट आखण्यात आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अब्दुल अजीज शेख उर्फ अज्जू हा मुख्य सूत्रधार आहे. ताडदेवमधील अनधिकृत झोपडपट्ट्यांना अधिकृत करण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि विजय कोळी यांनी याविरोधात तक्रार केली होती. यामुळे अब्दुल यांच्या मनात राग होता. विजय कोळी यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी अब्दुलने इतर आरोपींना पैसे दिले होते. अब्दुल याचं विजय कोळींसोबत राजकीय वैमनस्यदेखील आहे, अशी माहिती दत्ता नलवडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी अय्याज याला ९ जानेवारी रोजी अटक केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडे १५० ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ज सापडलं होतं. चौकशी केल्यानंतर अय्याज याने आपल्याला विजय कोळी यांच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवण्यासाठी आणि नंतर पोलिसांना फोन करुन टीप देण्याची सुपारी मिळाल्याची कबुली दिली, अशी माहिती दत्ता नलवडे यांनी दिली आहे. पोलिसांनी याशिवाय आसिफ सरदार, नबी शेख आणि जाफर शेख यांना अटक केली आहे. आसिफ सरदार तर ड्रग्जविरोधी संस्थेचा संचालक आहे.