सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ
देश बातमी

सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ऐतिहासिक नऊ न्यायाधीशांना एकाचवेळी शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. हा शपथ सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरन्यायाधीश एनवी रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. सामान्यत: न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी शपथ घेतली.

नऊ न्यायाधीशांना शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. तर स्वीकृत संख्या ३४ असल्याने अजूनही एक जागा रिक्त असणार आहे. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत ९ नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती. २०१९ नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नऊ नावांची शिफारस २२ महिन्यांनंतर पाठवली होती.