ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
देश बातमी विदेश

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतही सर्तक झाला असून खबरदारीच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागला आहे. नव्या वर्षात लस आल्यानंतर करोनाची संपुष्टात येण्याची आशा असतानाच करोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे. वेगानं पसरत असलेल्या या करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे.

तर भारतात कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं.

संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत. तसेच, ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं म्हटलं आहे.