पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय
पुणे बातमी

पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिका आणि खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’.

त्याचबरोबर, पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत. गेल्यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांचे अवघे ५ टक्के हमीपत्र जमा झाले होते. यावेळीही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात देखील पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली होती. पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा कोरोना स्थितीचा आढावा आणि पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही विद्यार्थी आणि पालक सकारात्मक नसल्याने शाळा ३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.