तर अण्णा हजारे उपोषणाला बसणार
देश बातमी

तर अण्णा हजारे उपोषणाला बसणार

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मी उपोषणाला बसणार, अशा आशयाचे पत्र आण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सुरु असलेलं हे आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, फळं, भाजीपाला, दूध यांसाठी एमएसपी लागू करणे, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करणं, आयात-निर्यातीची नीती ठरवणं या मागण्याही या पत्रामध्ये करण्यात आल्या आहेत. गेल्या १६ दिवसांपेक्षा जास्त काळ पंजाब आणि हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. कृषी कायदे रद्द केले जावेत ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ऐन थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर अर्थात सिंघू बॉर्डरवर हे आंदोलन सुरु आहे.

शेतकरी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. मात्र तरीही शेतकऱ्यांसाठी सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. केंद्र सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मी पुन्हा उपोषणाला बसणार असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.