उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; जोशीमठाचे मोठे नुकसान
देश बातमी

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; जोशीमठाचे मोठे नुकसान

उत्तराखंड : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे ग्लेशर कोसळल्याने धरण फुटल्याची घटना समोर आली आहे. यात अनेकजण बहुन गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही दुजोरा दिला आहे. तपोवनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका नदीमुळे ही आपत्ती ओढवली आहे. ज्या नदीचा उल्लेख केला जात आहे, तिला धौली गंगा नावानेही ओळखले जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोवन रैणी भागात हिमकडा कोसळल्याने ऋषिगंगा पावर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे अलकनंदा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहोचावे. चमोली पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नंबरदेखील जारी केला आहे.

तर, पोस्ट जोशीमठ येथील हेड कॉन्स्टेबल मंगल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वाजून 55 मिनिटांनी जोशीमठ पोलीस ठाण्यातून रैणी गावात हिमकडा कोसळल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री रावत म्हणाले की, टचमोली जिल्ह्यातून आपत्ती आल्याचे वृत्त समजते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापनाला या आपत्तीचा सामना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकार सर्वप्रकारची आवश्यक ती पावले उचलत आहे.

तथापि, धौलीगंगा सुमारे 95 किलोमीटरपर्यंत वाहते. त्याची सुरुवात देववन हिमानीपासून होते आणि विष्णू प्रयागमधील अलकनंदपर्यंत जाते. यामुळे याचा परिणाम अलकनंदावरही होणार आहे आणि म्हणूनच अलकनंदच्या आसपासच्या भागातही याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ही नदी पुढे गंगेला जाऊन मिळते आणि त्याचा परिणाम ऋषिकेश हरिद्वारपर्यंत दिसू शकतो.