आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू
देश बातमी

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू

बंगळूर : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री कर्नाटकात भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे जखमी झाले. कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. नाईक हे पत्नीसह येल्लापूरहून गोकर्णाला चालले होते. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते. पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला आहे. नाईक यांच्यावर गोव्यात योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचना मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना केली आहे. पुढील उपचारासाठी नाईक यांना गोव्याला हलविण्यात आलं आहे. केंद्रात मंत्री असलेले ६८ वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालयाची तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.

श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणालेत. तर गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावं, असंही राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं.