कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन लसीचेही दर जाहीर
देश बातमी

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन लसीचेही दर जाहीर

नवी दिल्ली : सिरमच्या कोविशिल्ड लसीचे दर अदर पूनावाला यांनी जाहीर केले असताना आता भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत बायोटेकच्या दरपत्रकानुसार कोवॅक्सिन राज्य सरकारांना ६०० रुपये प्रतिडोस, खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रतिडोस इतक्या किंमतीला घ्यावी लागणार आहे. याशिवाय, परदेशात निर्यात करण्यासाठी लसीची किंमत १५ ते २० डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारसाठी कोवॅक्सिनचा दर १५० रुपयेच असणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसीचे दर जास्त असल्याच्या प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांत उमटू लागल्या होत्या. सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी नुकतेच कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले होते. यानुसार राज्य सरकारला कोविशिल्ड ४०० रुपये प्रतिडोस तर खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांना प्रतिडोस ६०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा केंद्र सरकारसाठीचा दर १५० रुपयेच ठेवण्याची तयारी केली असताना कोविशिल्डचे दर मात्र वाढवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.