बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….
देश बातमी

बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशभरातून विविध स्तरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. अशातच देशातील खेळाडूंनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास आपले पुरस्कार परत करण्याचीदेखील घोषणा केली आहे. यात आता भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत, काळे कायदे मागे न घेतल्यास आपला खेलरत्न पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विजेंदरला देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र ३५ वर्षीय विजेंदर सिंहने शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. याबाबत बोलताना विजेंदर म्हणाला की “मी पंजाबचं खूप काही देणं लागतो. बॉक्सिंग खेळत असताना मी बराच कालावधी पंजाबमध्ये घालवला आहे. त्यामुळे या निमीत्ताने पंजाबला आणि शेतकऱ्यांना पाठींबा देऊन मी ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठींबा आहे. संपूर्ण देशाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहायला हवं कारण ते देशाची लाईफलाईन आहेत.”

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करताना मी जे यश मिळवलं त्यासाठी मला खेलरत्न पुरस्कार मिळाला. पण सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वागवत आहे ते पाहता निषेध म्हणून मी माझा पुरस्कार आणि त्यानिमीत्ताने मिळणारे सर्व लाभ परत करेन. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. सर्व खेळाडूंनीही शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठींबा दर्शवावा अशी मागणी विजेंदरने केली.

दरम्यान देशभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहेत. सर्वसामान्य माणसापासून ते बॉलीवूड सेलिब्रिटीही या आंदोलानाला पाठींबा देत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरली. याचवेळी ८ डिसेंबरला भारत बंदचे पुन्हा सुतोवाच करीत शेतकरी नेत्यांनी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा दिला.