शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…
राजकारण

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशाराही देखील शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला होता. शरद पवारांच्या याइशाऱ्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात फक्त बदल केला जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यात नव्याने कोणताही मोठा बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते, तेच कायम असून फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शरद पवार यांनी सकाळी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं.

या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले, ”आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं आहे. विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. पण त्याचबरोबर जगातील १७-१८ देशांना धान्य पुरवण्याचं काम भारत करतो. त्यात पंजाब आणि हरयाणाचा वाटा फार मोठा आहे. ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. पण, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही.

पवार पुढे म्हणाले की, ”मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,”असा सल्लाही पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान,९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुढील बैठक दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. शनिवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. त्याआधी ८ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.