काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत
बातमी मुंबई

काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत

मुंबई : मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्येदेखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागामध्ये ५० मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांचा वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

दरम्यान, एकीकडे चेंबूरमध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या विक्रोळी परिसरातून अशीच एक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे ६ जणांचा मृत्यू गेल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे. चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडुपमध्ये देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.