भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात
देश बातमी

भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक दिशा भरकटून चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती त्याने दिली आहे. आज रात्री किंवा रविवारी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. त्यासाठी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या महिन्यात ८ जानेवारी रोजी देखील लडाखच्या भारतीय हद्दीत अशाच एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले होते. पण काही दिवसातच प्रक्रियेनुसार, त्याला परत चीनकडे सोपवण्यात आले. तथापि, पूर्व लडाखमध्ये मागच्यावर्षीपासून भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असेऊन फायटर विमानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र दोन्ही बाजूंनी तैनात केली आहेत.

तर दुसरीकडे, दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. मात्र अद्याप दोन्ही देशांमधला सीमावादाचा तिढा सुटलेला नाही. चीनच्या आक्रमकतेमुळे हा वाद अधिकच  चिघळत चालला आहे. मात्र भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर चिनी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

त्याचबरोबर, जून महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग सरोवराच्या परिसरात गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. चीन पँगाँग सरोवराच्या फिंगर फोर भागातून माघार घेत नाहीय. याच भागातील महत्त्वाच्या टेकडया भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेऊन चीनवर रणनितीक दृष्टीने वर्चस्व मिळवले आहे.