ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित

ब्राझीलिया : दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये कोरोनाने अक्षरशः पुन्हा थैमान घातले आहे. ब्राझीलमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील २४ तासांत एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती आहे. युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा वेग चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ब्राझीलमध्ये एकाच दिवशी ३२५१ जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात कोरोना बळींचा आकडा तीन लाखांहून अधिक झाला आहे.

ब्राझीलमध्ये मंगळवारी ३२५१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या साओ पाउलोमध्ये १०२१ जणांचा मृत्यू झाला. याआधी या ठिकाणी एकाच दिवसात ७१३ मृतांची नोंद करण्यात आली होती. ही संख्या सर्वोच्च होती. मागील वर्षी जुलै महिन्यात ७१३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. कोरोनामुळे ब्राझीलची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू विभागात रुग्णांसाठीची उपलब्धता आणि ऑक्सिजनच्या साठ्याची कमतरता जाणवत आहे.