युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही
देश बातमी

युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा झाली होती. तसेच, गेल्या वर्षी युपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी वाढवून द्यावी अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना युपीएससीची परीक्षा देता आली नव्हती. काही जणांचा तो शेवटचा प्रयत्न असल्याने आणि वयाची मर्यादा संपल्याने तो प्रयत्न वाया गेला असल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं होतं.

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारने यावर विचार करावा असे निर्देश दिले होते. आता यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपले मत मांडले असून अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांनी केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना सोमवार, 25 जानेवारीपर्यंत या संबंधी न्यायालयात प्रतिज्ञापत्रक द्यायला सांगितलं आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी दिल्ली, पुणे, चेन्नई या सारख्या ठिकाणाला प्राधान्य देत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थी आपापल्या गावी गेले होते. अशातच,पूर, दुष्काळ आणि कोरोना महामारी यामुळे देशभरातील रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचणी आल्या होत्या. काही ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. मात्र आता 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी अंतिम निर्णय होणार आहे.

युपीएससीच्या नियमांनुसार, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा नऊ प्रयत्न आणि 35 वर्षे इतकी आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाच्या 37 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. तर साधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा प्रयत्न देता येतात तर त्यांना वयाची मर्यादा ही 32 इतकी आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही.