कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवरच गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. मात्र आता येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून देशातील सर्व टोल बंद करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी मोदी सरकारच्या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे पुतळेदेखील जाळणार आहोत. अशी माहिती पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. उद्या 5 डिसेंबरला दुपारी दोन वाजता पुन्हा शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. संशोधन नको, कायदा मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय तोडगा निघतो हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कालच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं जेवणही नाकारलं. त्यांनी लंगरमधलं जेवणच खाणं पसंत केलं होतं. दिल्ली येथील विज्ञान भवनात जवळपास साडेतास तास ही चर्चा सुरू होती. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने आजही ही चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेवेळी सरकारकडून शेतकऱ्यांना दुपारचे जेवण आणि चहा देण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांनी हे सरकारी जेवण नाकारले. आमचं जेवण सोबत आणल्याचे त्यांनी केंद्रीय नेत्यांना सांगितले.

यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधली विश्वासाची दरी किती लांब आहे दिसतं. दुसरीकडे प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला. इतरही अनेक खेळाडू उद्या अवॉर्ड वापसी करणार आहेत. वाहतूकदार, वकिलांच्या संघटनाही शेतकऱ्यांसाठी पुढे येतायत. त्यामुळेच हा वाढता दबाव सरकार कसा हाताळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.