जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?
राजकारण

जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?

औरंगाबाद : मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्त्व बनू पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता डॉ. कराड यांनी मराठवाड्यात जनआर्शिवाद यात्रा काढण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या यात्रेचे नियोजन सुरू असले तरी, या यात्रेला पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एन्ट्री नसल्याची माहिती मिळत आहे, तशा प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना डावलत नुकतेच राज्यसभेवर वर्णी लागलेले आणि दिल्लीतील राजकारणाचा अनुभव नसलेले डॉ. भागवत कराड मंत्री झाले. पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठीच त्यांच्याच कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा होती.

त्याचबरोबर आता कराड यांना मराठवाड्यात यात्रा काढण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. याआधी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीच अशा प्रकारे संघर्ष यात्रा काढलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. कराड यांची यात्रा, पंकजा यांना शह देण्यासाठीच असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कराड यांची यात्रा बीड जिल्ह्यातील भगवान गड इथून सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, स्वत: पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या यात्रेला विरोध होत आहे. त्यामुळे अखेर बीड जिल्हा वगळून डॉ. कराड यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ पाच जिल्ह्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.