मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय
बातमी विदेश

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोटार वाहने बनवणारी महत्वाची कंपनी फोर्ड मोटारने भारताबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लाँच केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कारखाने बंद करण्यासाठी जवळपास एका वर्षाचा अवधी लागेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार आहे. कंपनीचे साणंद आणि मराईमलाई येथे कारखाने आहेत. दरम्यान देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे देशात गाड्या विकत राहील अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्याासाठी डीलर्संना मदत होणार आहे. गेल्या १० वर्षात कंपनीला २ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. तर २०१९ मध्ये नॉन आपरेटिंगमुळे ०.८ अब्ज डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये कंपनीने देशभरात एकूण १ हजार ५०८ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ४ हजार ७३१ वाहनांची विक्री केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६८.१ टक्क्यांची घट दिसून येत आहे. याशिवाय पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअरदेखील ०.६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ टक्के इतका होता. सध्या फोर्ड कंपनी भारतीय बाजारात फोगो हॅचबॅक, एस्पायर सेडान गाड्यांसह एसयूव्ही सेगमेंटमध्ये इकोस्पोर्ट, एन्डेव्हर आणि फ्रीस्टाइल मॉडेलची विक्री करत आहे. एन्डेव्हर भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ९२८ एन्डेव्हर गाड्यांची विक्री केली. तर फोर्ड फिगो या गाड्यांच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या महिन्यात फक्त ७ गाड्या विकल्या गेल्यात.