मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस घेणाऱ्या आणि या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांचं अभिनंदन, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी भारतात सर्वाधिक कोरोना लसीकरण उत्तर प्रदेशात झालं आहे. शुक्रवारी तिथे तब्बल 28 लाख 62 हजार जणांनी लस घेतली. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे. इथे 10 लाख 79 हजार जणांनी शुक्रवारी लस घेतली. केंद्रानं ऑगस्टमध्ये दररोज 1 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवलं होतं. हे शुक्रवारी पूर्ण झालं आहे. भारतात लसीच्या तुटवड्यादरम्यान हे टार्गेट पूर्ण करणं म्हणजे मोठं यश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 14 कोटीहून अधिक लोक असे आहेत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पूतनिकची लस दिली जात आहे. आतापर्यंत देशात सर्वाधित डोस कोविशिल्ड या लसीचे दिले गेले आहेत. देशात 54 कोटी डोस कोविशिल्डचे देण्यात आले आहेत. पुढच्या महिन्यापासून जायडस कॅडिलाची लसही 12 वर्षावरील सर्व लोकांना देण्यास सुरुवात केली जाईल.