रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना
देश बातमी

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना

नवी दिल्ली : देशभरात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. तसेच, दर दोन महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते. मंगळवारी झालेल्या या गटाच्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांवर तोडगा काढण्यासाठी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली असून त्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देखील दिले आहेत.

मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचं देखील दिसून आलं आहे. त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांचं प्रमाण कमी होऊ शकेल.