हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

वर्धा : हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने 3 फेब्रुवारी 2020 रोजी तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण ४० टक्के भाजली. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तथापि, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात होणार असून उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या 25 दिवसांत म्हणजे 28 फेब्रुवारीला न्यायालयात 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तसचे हा खटला चालवण्यासाठी वर्ध्यात फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे पार पडणार आहे.

दरम्यान, हिंगणघाट जळीतकांड घटनेनंतर राज्यभरात मोठा अन्तोष मजला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन महिन्यांत खटला निकाली काढून आरोपीला शासन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती.

त्या दिवशी हिंगणघाटमध्ये नक्की काय घडलं?
हिंगणघाट मधील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

कोण आहे विक्की नगराळे?
आरोपी विक्की नगराळे याचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वीपासून त्याने पीडितेला त्रास द्यायला सुरवात केली होती. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते. विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. या घटनेनंतर राज्यभरात विक्की नगराळेविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात वर्ध्यातील कारागृहात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात होती. कारागृहात विक्कीवर इतर कैद्याकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे बॅरेकमधील काही कैद्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलं आहे.