रामदेवबाबांच्या वाढल्या अडचणी; आएमएकडून कारवाईची मागणी
देश बातमी

रामदेवबाबांच्या वाढल्या अडचणी; आएमएकडून कारवाईची मागणी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं सावट असताना योगगुरु रामदेवबाबांच्या विरुद्ध आयएमएने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आएमएने जारी केलेल्या पत्रकात एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

देश कोरोनाची लढाई लढत आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकारही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत आतापर्यंत १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी जीव गमवला आहे. असं असताना योगगुरु रामदेव आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचं विज्ञान आहे, असं सांगताहेत, याकडेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

योगगुरु रामदेव यांनी कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.