मोठा निर्णय : कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज
देश बातमी

मोठा निर्णय : कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज

नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला डिस्चार्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या काही काळापासून कोरोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने कोरोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत कोरोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी कोरोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केलं जात होतं. मात्र अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे. गेल्या शुक्रवारी आयसीएमआर, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं.

केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलं होतं. भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उपचार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. तरीही भारतभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे, असं या पत्रात म्हटलं होतं. सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे करोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला होता.