केंद्राच्या धोरणांवर नाराजी; कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का
देश बातमी

केंद्राच्या धोरणांवर नाराजी; कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का बसला असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन्साकॉग या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील विषाणूंच्या प्रकारांची जनुकीय क्रमवारी निर्धारित करण्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांचा मिळून इन्साकॉग हा गट केंद्र सरकारने स्थापन केला होता. गेल्या शुक्रवारी झालेल्या इन्साकॉगच्या बैठकीत डॉ. जमील यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यासाठी डॉ. जमील यांनी कोणतेही कारण दिलेले नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत डॉ. जमील यांनी द न्यू यॉर्क टाइम्समध्ये नुकताच एक लेख लिहिला होता. कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व शक्य उपाययोजनांना भारतीय वैज्ञानिकांचा पाठिंबा आहे. मात्र पुरावाआधारित धोरणनिर्मितीस त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो, असे त्यांनी या लेखात नमूद केले होते. कोरोनाबाबत पुढील अभ्यास, संशोधन, भाकीते करता येणे शक्य होईल, अशी माहिती, तपशील उपलब्ध करून देण्याचे आवाहन सुमारे ८०० भारतीय वैज्ञानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० एप्रिल रोजी केले होते, याकडेही त्यांनी या लेखात लक्ष वेधले होते. एकूणच सरकारच्या कोरोना हाताळणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

डॉ. जमील यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारवरील नाराजीमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी प्रतिक्रिया शुक्रवारच्या बैठकीत सहभागी झालेल्या त्यांच्या एका सहकाऱ्याने व्यक्त केली. अन्य तीन सहकाऱ्यांनीही डॉ. जमील यांचा राजीनामा हा अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या अज्ञानामुळे देशाचे नुकसान होत आहे. आता आणखी किती नुकसान होणार आहे, असा सवाल यावरून काँग्रेसने केला आहे. डॉ. जमील यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आले, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला.