आज जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
बातमी विदेश

आज जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज (ता. २०) अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबतच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्या दृष्टीनं पाहता हा सोहळा एक ऐतिहासिक प्रसंगच ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बायडन यांच्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार उपराष्ट्रपती कमला हॅरीस रात्री 10 वाजता शपथ घेतील, तर रात्री 10.30 वाजता राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी होईल. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स स्थानिक वेळ १२ वाजता जो बायडन यांना शपथ देतील.शपथ घेतल्यानंतर लगेचचं राष्ट्राला राष्ट्रपती म्हणून आपलं पहिलं संबोधन करतील. ऐतिहासिक भाषण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विनय रेड्डी तयार करत आहेत.

या शपथविधी सोहळ्यात गायिका-नृत्यांगना लेडी गागा राष्ट्रगीत गाणार आहे. तर, अमांडा गोरमॅन या शपथविधी सोहळ्यासाठी लिहीलेली एक खास कविता वाचून दाखवतील. अभिनेत्री जेनिफर लॉपेझ गाणं सादर करणार आहे.

दरम्यान, ५९ व्या अध्यक्षीय शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून ‘अमेरिका युनायटेड’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. हा मुद्दा घेऊन बायडेन आणि हॅरिस यांनी सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. एरव्ही हा कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष लागलेले असते. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या साथीचे आणि अलीकडेच कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराचे त्यावर सावट आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी नेहमीसारखी प्रचंड गर्दी नसेल. केवळ एक हजार जणांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर, जवळपास २५ हजाराहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.