लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन मंजूर
देश बातमी

लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन मंजूर

पटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून ते चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंजुरीविना लालू प्रसाद यादव यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर ९ एप्रिलला सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अवधी मागितला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. हा दावा जामीन अर्ज दाखल करताना करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर चाईबासा आणि देवघर प्रकरणात लालू यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.