मुंबईची पुन्हा तुंबई ! रात्रभर तुफान पाऊस
बातमी मुंबई

मुंबईची पुन्हा तुंबई ! रात्रभर तुफान पाऊस

मुंबई : मुंबईची पुन्हा तुंबई झाली असून गुरुवारी रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गांधी मार्केट परिसरामध्ये तर एक ते दीड फूटांपर्यंत पाणी साचलं आहे. वडाळ्यामध्येही काही ठिकाणी पाणी साचलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासूनच वीजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीची गती मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं. कुर्ला- विद्याविहारदरम्यान ट्रॅक्सवर पाणी साचल्याने वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने होत आहे. कुर्ला-विद्याविहारदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. हार्बर मार्गावरील वाहतूकही २०-२५ मिनिटं उशीराने होत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने असली तरी सुरळीत सुरु असल्याचं म्हटलं आहे. चुनाभट्टी, शीव रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये सखल भागांमध्ये रात्रभर पाऊस पडल्याने पाणी साचलं आहे.

कुर्ल्यामधील लाल बहादुर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील शितल सिनेमाजवळ, शीवमधील रोड नंबर २४, साईनाथ सबवे, चेंबूर फाटक, मलीन सबवे, अंधेरी बाजारपेठ, अंधेरी सबवे, गांधी मार्केट, हिंदमाता, आरसीएफ कॉलनी, वडाळा ब्रीजजवळ रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे मुंबईच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांपर्यंत घट झाली.