लोकसभा सचिवांची ३ खासदारांना नोटीस; खासदारकी धोक्यात
राजकारण

लोकसभा सचिवांची ३ खासदारांना नोटीस; खासदारकी धोक्यात

नवी दिल्ली : लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी लोकसभा सचिवांनी गुरुवारी खासदार शिशिर अधिकारी, सुनिल कुमार मंडल आणि के रघु रामा क्रिष्णनम राजू यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस पक्ष बदल कायद्यांतर्गत बजावण्यात आली आहे. तिन्ही खासदारांना १५ दिवसांच्या आत या नोटीसीला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी शिशिर अधिकारी आणि सुनील कुमार मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर वायएसआरसीचे खासदार रघु रामा क्रिष्णनम राजू यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता लोकसभा सचिवांनी तीन खासदारांना नोटीस पाठवली आहे.

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्डवन लोकसभा क्षेत्रातून मंडल हे तृणमूलच्या तिकिटावर खासदार झाले होते. मात्र गेल्यावर्षी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर पूर्व मिदनापूरमधून खासदार असलेले शिशिर अधिकारी यांनी मार्चमध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या मुलगा शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं होतं.